पाचव्या जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

सन्माननीय साहित्यप्रेमी बंघुभगिनींनो, 
      सावंतवाडीसारख्या निसर्ग-रम्य सुंदर ऐतिहासिक नगरीत होत असलेल्या पाचव्या शिक्षक कवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान शिक्षक वाड्.मय चर्चा मंडळाने मला देऊन एका साहित्यिकाचा तसेच साहित्य चळवळीतील एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान केलात त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. 
       यापूर्वी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद ज्येष्ठ कवी व कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कवी व समीक्षक अनिल फराकटे, कवी वाय. पी. नाईक व कवी पुरानिक यांनी भूषविले आहे. मला आपण या ज्येष्ठ साहित्यिकांच्या पंक्तीत बसवलात. या पंक्तीत बसताना थोडसं अवघडल्यासारखं होत आहे. मी आज ज्यांच्या पंक्तीत बसलो, ते पूर्वीच्या साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष तसेच आता मी ज्यांच्या सोबत अाहे  ते साहित्य पीठावरील मान्यवर, तेवढ्याच तोलामोलाचे समोर बसलेले साहित्यप्रेमी हे साहित्याचे जाणकार असल्याने, मी आपल्यासमोर साहित्यिक विचार मांडवेत अगर मार्गदर्शक विचार व्यक्त करावेत, एवढया योग्यतेचा मी नक्कीच नाही. 
         मित्रहो,  मी एक शिक्षक आहे. याचा मला अभिमान आहे. शिक्षकी पेशावर माझी निष्ठा आहे. माझ्या या जीवन प्रवासात विशेषतः शिक्षकी पेशातील पंचवीस वर्षाच्या सेवा कालखंडात मी जे अनुभवलं ते अधूनमधून शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 
       
         जसं दुपारच्या उन्हात पाणी तापावं
         वाफ बनून ते पाणी ढगात साठावं
         त्याला गार वा-याच्या प्रेरणा मिळाव्यात 
         आणि पावसाच्या सरी भूमीवर कोसळाव्यात

अगदी तसच.... 
         आयुष्याच्या वाटेवर चालताना
         अनुभवाचे ढग
         या सहृदयी मनाने मिठीत घेतले
         आणि हृदयीच्या ढगांना जेव्हा प्रेरणा मिळाळ्या
         तेव्हा माझ्या काव्यसरी कोसळल्या 

          'काव्यसरी ' हा माझा पहिला काव्यसंग्रह. हा काव्यसंग्रह एका कवीचा आहे की नाही ते मी सांगणार नाही. ते काव्यरसिक मायबाप ठरवतील. मी मात्र एवढच सांगेण, हा कवितासंग्रह एका साहित्यिक चळवळीतील कार्यकर्त्याचा आहे. शिक्षकाचा आहे. 
          शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना, साहित्यिक चळवळीकडे पावले केव्हा व कशी वळली हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. मी लिहिता कसा झालो?  याचा विचार करतो, तेव्हा मला मिळालेल्या थोरा मोठमोठ्यांच्या 'प्रेरणा' हेच त्याचं मुख्य कारण समोर येते.जीवनाच्या वाटेवर अनेक माणसं व  त्यांचे विचार भेटत गेले. शिकण्याच्या व शिकवण्याच्या प्रपंचातून पुस्तकांशी मैत्री घट्ट होत गेली. पुस्तके साहित्याची व साहित्यिकांचीआेळख करून देत राहिली. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, डॉ. वसंत सावंत व वसंत आपटे या साहित्यिकांचा लेखणीने मी बालपणीच प्रभावीत झालो हेतो. एम्. फिल्. च्या प्रवासात अजय कांडर यांच्याशी संवाद साधण्याचा अनेकवेळा योग आला. माझ्या लेखन प्रवासात कांडर सरांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी ठरत आले आहे. साहित्यिक मान्यवरांसह कुटुंब, समाज, मित्र परिवाराकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मिळत गेलेल्या प्रेरणांमुळे माझ्या जबाबदारीच्या जाणीवांचा विस्तार होत गेला. मित्रहो, जीवनात प्रेरणा  श्वासासम असते. 
       आज अनेक शिक्षक लेखन करत आहेत.ते स्वतःची साहित्यिक म्हणून ओळख निर्माण करू पाहत आहेत. या नव शिक्षक साहित्यिकांना विशेषतः नव कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अनेक साहित्यिक संस्था कार्यरत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याचा याप्रसंगी आवर्जुन उल्लेख करावा लागेल. व्हाॅटस् अॅप, फेस बुक आदी सोशल मीडिया समूह साहित्य चळवळीला पूरक उपक्रम राबवित आहेत.जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षणसिंधू साहित्य प्रेरणा मंच स्थापन केला असून त्या समूहाच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांचे साहित्य प्रसारित केले जात आहे. दोडामार्गासारख्या ग्रामीण भागात तेथील शिक्षकांनी साहित्य मंच स्थापन केलाआहे.  सिंधुदुर्गातील प्रिंट मीडियाही शिक्षक -विद्यार्थ्यांच्या साहित्यास प्रसिद्धी देत आहे. दैनिक प्रहार मधून किलबिल सदरातून विद्यार्थ्यांच्या साहित्यकृतींना दिलेली प्रसिद्धी ही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणाच आहे.या साहित्य प्रेरणेच्या चळवळीतील शिक्षक वाड्.मय चर्चा मंडळ यांचे कार्य विशेष उल्लेखनीय असून हे साहित्यिक मंडळ गेली अनेक वर्षे सातत्याने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लेखनास प्रेरणा देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. . या मंडळाच्या वतीने कवी मनाला व्यक्त होण्यासाठी काव्यमैफलींचे आयोजन केले जाते. शिक्षक -विद्यार्थ्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. प्रतिवर्षी कवी मनाच्या साहित्यिक शिक्षकांचा 'शिक्षक वाड्.मय पुरस्काराने गौरविले जाते. यावर्षी या जिल्ह्यातील गुणवंत व प्रतिभावंत कवी मनोहर परब व कवी किशोर वालावलकर यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येत आहे. खरच हा शिक्षक वर्गाचा चा सन्मान आहे. दोन वर्षापूर्वी मलाही या मंडळाच्या वतीने शिक्षक वाड्.मय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याबद्दल मंडळाला मी पुन्हा धन्यवाद देतो. कारण मंडळाने दिलेल्या पुरस्कारातून मला साहित्यिक वाटचालीस ऊर्जा  मिळाली आहे. 
        आज वाड्.मय मंडळाचे पाचवे संमेलन संपन्न होत आहे. या साहित्य संमेलनाचा हेतू हाच आहे की, यानिमित्ताने साहित्यिक शिक्षकांनी एकत्र यावे. एकमेकांना भेटावे. साहित्यावर चर्चा करावी. शिक्षकांच्या साहित्याला व्यासपीठ निर्माण करून देणे. अलीकडे बरेचसे विद्यार्थीही आवडीने कविता करतात.काही शाळांमधून विद्यार्थ्यांचे कवितासंग्रही प्रकाशित झाले आहेत.यातून साहित्यिक चळवळ व ज्ञानरचनावाद वर्गखोलीपर्यंत पोहोचविण्यात आजचा शिक्षक कमालीचा यशस्वी झाल्याचे अधोरेखित होत आहे. अशा शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे या साहित्य पीठावरून अभिनंदन करण्यात येत आहे. 
      या व्यासपीठावरून वैचारिक मंथन होणेही अपेक्षित आहे. साहित्य हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. त्यातील कविता हे अधिक प्रभावी व परिणामकारक माध्यम आहे. कवितेच्या माध्यमातून विचाराचे वहन अधिक गतीने होते. कवितेच्या माध्यमातून सिंधुभूमीच्या कवींनी सामाजिक जडणघडणीत मौलिक योगदान दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संपदा समृद्ध आहे. या साहित्य संपदेस सावंतवाडी संंस्थानातील बाद्याच्या नाथसंप्रदायी संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या 'अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे' या आध्यात्म गीताचा गंध आहे. कवी विंदा करंदीकर यांच्या शब्दसामर्थ्याने मराठीला ज्ञानपीठ पुरस्काराचा बहुमान प्राप्त झालाआहे.सौंदर्यलक्षी कवी डॉ. वसंत सावंत याच भूमीतले. त्यांच्या ब-याचशा कवितांचा जन्म या सुंदरवाडीत झाला. स्वच्छंदवादी कवी मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, आरती प्रभू,आ. ना. पेडणेकर, आ. द. राणे अशा कवींनी  मराठी कविता समृद्ध केली आहे. आजच्या कवितेच्या मुख्य प्रवाहात अजय कांडर,  प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, डॉ. अनिल धाकू कांबळी, डाॅ. गोविंद काजरेकर, आ. सो. शेवरे, मधुसूदन नानिवडेकर, मोहन कुंभार, डॉ. शरयू आसोलकर, आदी कवींनी स्वत:स सिद्ध केले आहे. या भूमीतील नामदेव गवळी, दादा मडकरईकर, सफरअली हसफ, अरूण नाईक, विठ्ठल कदम आदी कवी सातत्याने लेखन करीत आहेत. या सगळ्यांच्या पाऊल वाटेवरून उषा परब, वैशाली पंडित,सुनंदा कांबळे,सुषमा सांगळे,  कल्पना बांदेकर, कल्पना मलये,सरिता पवार,  मनोहर परब,किशोर वालावलकर,उदय सर्पे,   सूर्यकांत चव्हाण, शर्वरी राजाध्यक्ष, मृण्मयी बांदेकर, रुपेश वालावलकर आदी कवी लेखन प्रवास करीत आहेत. यातील बरेचसे कवी हे पेशाने शिक्षक आहेत.शिक्षकी पेशातून शैक्षणिक परिवर्तन तर लेखणीतून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी हे शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसतात. 
      आज वर्गखोलीत निर्माण केलेल्या मूल्यांचा  समाजात -हास होताना दिसतो.अशावेळी संवेदनशील शिक्षकाचे मन दु:खी होते. वर्गखोलीच्या बाहेरही अध्यापन वा उद्बोधनाची, जनजागृतीची गरज विचारात घेऊन लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे धाडस काही शिक्षक करू पाहत आहेत. समाजाच्या व्यथा, वेदनांचा ते आपल्या लेखणीतून वेध घेत आहेत. शिक्षकांचे हे साहित्यिक प्रकटीकरण भविष्यात मानवी मूल्यांच्या संवर्धनास सहाय्यभूत ठरेल. मात्र राजकीय इच्छाशक्तीने अशा मूल्यवर्धक लेखणीचा स्वीकार करणेचे तितकेच गरजेचे वाटते.
        सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक साक्षर जिल्हा, पर्यटक जिल्हा, फुला फळांचा जिल्हा, गड-दुर्गांचा जिल्हा, स्वच्छ जिल्हा, सुंदर जिल्हा व समृद्ध जिल्हा म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कला, साहित्य,  संस्कृतीचा दे़दीप्यमान वारसा लाभला आहे. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीबरोबर मौख्यिक साहित्य, लोककला, बोलीभाषा आजही या मातीने जपून ठेवल्या आहेत. अशा नावीन्याचा आविष्कार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपला जिल्हा   साहित्याच्या माध्यमातून जगाशी जोडला गेला पाहिजे. आज जिल्ह्यातून अनेक साहित्यक लेखन करत आहेत. अशा नवलेखकांचे वा कवींचे साहित्य प्रकाशित होणे गरजेचे आहे. म्हणून मी या वाड्.मय मंडळाला व जिल्ह्यातील साहित्य चळवळीत कार्य करणाऱ्या संस्थांना विनंती करतो की भविष्यात नव साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. 
          दर्जेदार साहित्य निर्माण करणे हे साहित्यिकासमोर आव्हान आहे, तसेच दर्जेदार वाचक निर्माण करणे हे साहित्य च़ळव़ळीसमोरील आव्हान आहे. हे आव्हान शिक्षक समर्थपणे पेलवू शकतात.         वाचन संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती आहे. पण आज या संस्कृतीला दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. या घडीला ही संस्कृती अनेक अडथळे पार करत आहे.  वाचन संस्कृती कमी होण्यास आजची इलेक्ट्रॉनिक माध्यमे जशी जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा इंग्रजी भाषेचे फुटलेले पेव अधिक जबाबदार आहे. आज मराठीच्या दृष्टीने विचार केला तर, मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.आजचे विद्यार्थी हे उद्याचे वाचक आहेत. आज जी भाषा त्यांच्या शिक्षणाचे माध्यम आहे, त्याच भाषेतील पुस्तके ती मुले मोठी झाल्यावर वाचणार आहेत. म्हणजेच भविष्यात मातृभाषेतील पुस्तकांकडे वाचकांची पाठ फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्राचीन संस्कृतीचे, तत्त्वाज्ञानाचे, साहित्याचे दर्शन ग्रंथातून घडत असते. मनाची मशागत उत्तम दर्जाच्या पुस्तकांच्या वाचनातून होत असते. संस्कार घडविण्यासाठी मातृभाषेतील ग्रंथाएवढे प्रभावी साधन नाही. तथापि हे साधन विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशापासूनच दूर केले जात आहे.ही बाब चिंतेची आहे. याबाबत ब्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचे विचार महत्त्वपूर्ण वाटतात. ते म्हणतात,"वाचन संस्कृती निर्माण  करण्यासाठी नव्या ,  तरुण ग्रामीण साहित्यिकांचा जसा हातभार लागेल,  तसाच ग्रामीण समाजातील शिक्षकांचाही हातभार लागू शकेल असे मला वाटते.  शहरातील शिक्षकांपेक्षा ग्रामीण भागातील शिक्षकांवर वेगळी आणि फार मोठी नैतिक आणि सांस्कृतिक जबाबदारी येऊन पडते. प्राथमिक शाळांपासून ते महाविद्यालयांतील सर्वच अध्यापक- प्राध्यापकांना मी शिक्षकच मानतो.  ग्रामीण भागातील बहुजन समाज हा शेतकरी,  कष्टकरी, कामकरी आणि प्रामुख्याने निरक्षर असतो.  त्याची अनेक प्रकारची कामे ही शारीरिक श्रमाशी जोडलेली असतात.  अशा अडाणी कुटुंबातील मुलांना शिकविण्याची आणि घडविण्याची जबाबदारी शिक्षकाचीच असते. त्या दृष्टीने ग्रामीण विभागातील शिक्षक हा नव्या पिढीचा पालक आणि पिता  दोन्ही असतो. कारण तो सर्वार्थाने नव्या पिढीला घडवित असतो. माणूसकीचे मूलभूत संस्कार तो नव्या पिढीवर करत असतो. नीतीचे धडे देत असतो. जीवनातील उदात्त मूल्यांविषयी तरुण पिढीत श्रद्धा निर्माण करण्याचे त्याचेच कार्य असते.  त्यामुळे नव्या पिढीला नुसते शिकविण्याचे नव्हे, तर घडविण्याचेही काम त्याला करावे लागते. त्यासाठी चांगली चांगली पुस्तके शाळेच्या ग्रंथालयातून मिळवून ती वाचण्याची शिफारस तो करत असतो.  त्यामुळेच ख-या अर्थाने  नवी पिढी घडत असते." या विवेचनातून वाचन संस्कृती विकसित करण्यात शिक्षकाची भूमिका अधिक स्पष्ट होते. 
       
      स्थळ-सावंतवाडी 
        
      









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा