*बाल कला ,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०१९-२०*
*मित्रहो ,आजच्या क्रीडामहोत्सवाचा थोडक्यात वृत्तांत सादर करताना अत्यंत आनंद होत आहे . सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या क्रीडा महोत्सवाला २१ वर्षांचा इतिहास आहे. मागील वर्षापासून सिंधुक्रीडा महोत्सवाला सकारात्मक इच्छाशक्ती असलेले ,नित्यनूतनतेचा आस असलेले व शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास घेतलेले ,कार्यतत्पर नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने सिंधूक्रीडा महोत्सवाला घरच्या सण-उत्सवाचे स्वरूप आले आहे. विद्यार्थी ,शिक्षक, पालक व क्रीडा रसिकांना हवाहवासा वाटणारा यावर्षीचा हा क्रीडा महोत्सव अनेक यादगार क्षण घेऊन आला आहे*
*या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा ठळक वृत्तांत*
*महोत्सवासाठी डॉन बॉस्को स्कूलच्या भव्य पटांगणावर सभा मंडप सजविण्यात आला होता*
*महोत्सवाचा उदघाटन सोहळा नियोजित वेळेत सुरू झाला*
*या क्रीडा महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे प्रो. कबड्डी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई उर्फ बाहुबली उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. त्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी होती.*
*विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना व क्रीडा रसिकांना क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी यावर्षीपासून मा.शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब व मा. उपशिक्षणाधिकारी आंगणे साहेब यांच्या संकल्पनेतून सेल्फी पॉइंट ही नवीन संकल्पना राबविण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटला कमालीचा प्रतिसाद लाभला*
*उद्घाटन सोहळ्यापूर्वी साटेली भेडशी व वेंगुर्ले नं.४ या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले समूहनृत्य लक्षवेधी ठरले.*
*पडवे शाळेच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली.*
*मान्यवरांची उपस्थिती*
*डॉन बॉस्कोच्या भव्य पटांगणावर उभारलेल्या भव्य शामियान्यात क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, देवगड पंचायत समिती सभापती सुनिल पारकर ,देवगड पंचायत समितीच्या माजी सभापती आडिवरेकर मॅडम , वैभववाडी पंचायत समिती सभापती अक्षता डफळे, उपसभापती चेंदवणकर मॅडम ,प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी रामकृष्ण आंगणे ,डॉन बॉस्को विद्यालयाचे मुख्याध्यापक जॉनथन रूबेरो ,सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.*
*मनोगत*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने एकवीस वर्षापूर्वी सुरु केलेला क्रीडा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात अनुकरणीय ठरत असून आज या क्रीडा महोत्सवाला राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सिंधू एक्सपो,बांधावरची शाळा,इस्रो सफर यासारख्या अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची महाराष्ट्राने दखल घेतली आहे. याचे खरे शिलेदार शिक्षक व विद्यार्थी आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ऑलंपिक स्पर्धेचे अधिक जलद ,अधिक बलवान अधिक बुद्धिमान हे घोषवाक्य स्वीकारून, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अधिक जलद ,अधिक उंच,अधिक बलवान बनवण्यासाठी गेली २१ वर्षे सातत्याने क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या क्रीडा महोत्सवातील अनुभव विद्यार्थ्यांना जीवन जगताना निश्चितच प्रेरणादायी ठरतील ........... *मा .श्रीम .के.मंजुलक्ष्मी (मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सिंधुदुर्ग)*
*खेळाच्या मैदानावर अपार कष्ट ,जिद्द व सातत्य ठेवले तर आपणही सिद्धार्थ देसाई उर्फ बाहुबली बनू शकता.*
*........ मा .श्री .सिद्धार्थ देसाई (प्रो कबड्डी स्टार खेळाडू)*
*क्रीडा स्पर्धा निकोप वातावरणात यशस्वीपणे पार पाडाव्यात व प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेता यावा यासाठी मागील वर्षापासून क्रीडा स्पर्धेमध्ये काही नव्याने बदल करण्यात आलेले असून, या बदलाप्रमाणे केंद्रस्तरापासून तालुकास्तरापर्यंतच्या क्रीडास्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या आहेत. यावर्षी ज्ञानी मी होणार ही स्पर्धा केंद्रस्तरापासून ऑनलाईन घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाही यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व प्रशासन विभाग गेले अनेक दिवस अविरत मेहनत घेत असून ,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे यासाठी मोलाचे सहकार्य मिळत आहे.......मा.श्री. आंबोकर साहेब*
*सत्कार सोहळा*
*या उद्घाटन सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले प्रो. कबड्डी स्टार खेळाडू महाराष्ट्र सुपुत्र सिद्धार्थ जाधव यांचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के .मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
*देवगड तालुक्यातील पुरळ कळंई या प्राथमिक शाळेत शिकत असलेला धर्मेश पुजारी याने राष्ट्रीय स्तरावर गोळाफेक प्रकारात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी के . मंजूलक्ष्मी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.*
*सिंधूक्रीडा महोत्सवासाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करणाऱ्या जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पाताडे, ग्रामसेवा विकास मंडळ उंबर्डेचे विजय पांचाळ यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
*क्रीडा स्पर्धेसाठी भव्य मैदान उपलब्ध करून देणाऱ्या डॉन बॉस्को स्कूलचे मुख्याध्यापक जॉनथन रुबेरो यांचाही शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
*केंद्रस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत प्रथमोपचार पेटी सुविधा पुरविणारी संस्था उमेद फाउंडेशन यांचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद शिंगारे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.*
*सिंधुक्रीडा महोत्सवाच्या ध्वनिफीत निर्मितीसाठी विशेष योगदान देणाऱ्या रश्मी आंगणे, सचिन जाधव ,राजू वजराटकर, पुनम पालव यांचाही सत्कार करण्यात आला.*
*आभार उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी मानले.*
*शाम सावंत व रश्मी आंगणे व राजेश कदम यांच्या ओघवत्या शैलीतील निवेदनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.*
*विद्यार्थ्यांसाठी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती.*
*दिवसभरात झालेल्या स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले*
*आज मोठा गट मैदानी स्पर्धा व दोन्ही गटाच्या ज्ञानी मी होणार स्पर्धा स्पर्धा पूर्ण झाल्या असून उद्या नियोजित वेळेत लहान गटाच्या मैदानी व दोन्ही गटाच्या समूहगान स्पर्धा होणार आहेत*
*अतिशय सुंदर असं देखणं नियोजन आजच्या क्रीडा महोत्सवात पहायला मिळालं असून शिक्षक, क्रीडारसिक व पालक वर्गातून एक आगळावेगळा क्रीडा महोत्सव पहायला मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.*
=============================
*वृत्तांकन लेखन समिती सिंधुक्रीडा महोत्सव, सिंधुदुर्ग*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा