जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन
जिल्हास्तरीय बाल कला ,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०१९-२०दिनांक ३० डिसेंबर २०१९ ते १जानेवारी२०२० या कालावधीत सिंधुदुर्गनगरी येथे डॉन बॉस्को विद्यालयच्या पटांगणावर संपन्न होणार आहे.सदर स्पर्धेच्या नियोजनाची बैठक दि-२७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ,मुख्य प्रशासकीय इमारत सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. या सभेस प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर , उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, अधिक्षक (रा.प्र.) विनायक पिंगुळकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर , सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख , क्रीडा शिक्षक व क्रीडा समिती सदस्य उपस्थित होते .यावेळी शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब व आंगणे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने यावर्षी केंद्र स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नियोजित वेळेत क्रीडा स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे सूक्ष्म नियोजन केले आहे.या नियोजनानुसार तालुकास्तरापर्यंतच्या सर्व क्रीडा स्पर्धा नियोजित वेळेत विनातक्रार पूर्ण झाल्या आहेत .त्याबद्दल शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे .जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धाही अशाच प्रकारे यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यासाठी विविध क्रीडा समित्या तयार करण्यात आल्या आहेत. . सनियंत्रण समिती ,उद्घाटन व स्वागत समिती, अर्थ समिती ,निवास व्यवस्था समिती ,साहित्य वितरण समिती ,अभिलेख समिती, अल्पोपहार ,भोजन व पाणी समिती ,मैदान आखणी समिती ,मेडल व प्रमाणपत्र समिती,बक्षीस वितरण समिती ,सजावट समिती ,प्रथमोपचार समिती ,अहवाल लेखन व वृत्तांत लेखन समिती ,ज्ञानी मी होणार समिती ,समूहगान स्पर्धा समिती, समूह नृत्य स्पर्धा समिती ,आदी समितींच्या माध्यमातून स्पर्धेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.या क्रीडा समिती सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत स्पर्धेमध्ये नव्याने करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे ज्ञानी मी होणार स्पर्धा ऑन स्क्रिन घेण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी पडवे नं.१ या प्रशालेची मुले संचलन करतील. प्रत्येक तालुक्याचा विद्यार्थी क्रीडा-प्रतिनिधी मान्यवरांना मानवंदना देईल.क्रीडा स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या वेळी क्रीडा गणवेश वितरित करण्यात येतील. सहभागी विद्यार्थी ,संघ व्यवस्थापक व पंच यांच्या अल्पोपहाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी या नियोजन बैठकीत दिली.तसेच त्यांनी स्पर्धा प्रमुख, क्रीडा समिती सदस्य व पंच यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून क्रीडा स्पर्धा उत्तम प्रकारे यशस्वी कराव्यात असे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा