*सिंधुक्रीडा महोत्सव ठळक वृत्तान्त - दिवस दुसरा*
*क्रीडा महोत्सवाची दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहिल्या दिवसाप्रमाणे त्याच उत्साहात , त्याच जोशात आणि त्याच दिमाखात करण्यात आली. देवगड , वैभववाडी , दोडामार्ग आदी दूरच्या तालुक्यातील मुले व क्रीडा शिक्षक थंडीचे दिवस असतानाही वेळीच उपस्थित होते . या सर्वांबरोबर विविध क्रीडा समित्यांचे सदस्यही आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नियोजित वेळेपूर्वी उपस्थित होते .प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब , उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे ,सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांची मैदानावरील उपस्थिती खेळाडू व पंचांचा उत्साह वाढवत होती. ज्येष्ठ निवेदक श्याम ,रश्मी ,राजेश यांच्या गोड आवाजातून उपस्थित क्रीडा रसिकांचे स्वागत होत होते. आजच्या दिवसात लहान मुलांच्या मैदानी स्पर्धा व दोन्ही गटाच्या समूहगान स्पर्धा नियोजित वेळेत व निकोप वातावरणात पार पडल्या.*
*क्रीडा महोत्सवाच्या दुसर्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. समूहगान स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद गेली अनेक वर्षे सातत्याने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करत आहे. या क्रीडा महोत्सवातून ग्रामीण भागातील अनेक गुणवंत व कलावंत विद्यार्थी निर्माण होत असून हे गुणवंत व कलावंत विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत आहेत .यासाठी शिक्षक खूप मेहनत घेताना दिसतात.शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे योगदान निश्चितच गौरवास पात्र आहे .असे मत त्यांनी समूहगान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.*
*यावेळी समीर नाईक,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , समूहगान परीक्षक माधव गावकर ,उदय गोखले, कणकवली तालुका गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर ,शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.*
*यावेळी शिक्षणाधिकारी साहेब यांच्या हस्ते जि.प.अध्यक्ष समिधा नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .तसेच समीर नाईक ,समूहगान स्पर्धेचे परीक्षक माधव गावकर व उदय गोखले यांचाही सत्कार करण्यात आला.*
*अध्यक्ष मॅडमांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. समूहगान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सवात सहभाग घेतला.मैदानावर उपस्थित राहून त्यांनी खेळाडूंचे कौतुक केले. या क्रीडा महोत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांसह मॅडमांनी फोटोसेशन केले.अध्यक्ष मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद,केलेले कौतुक, मार्गदर्शन आणि फोटोसेशन विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.*
*दरम्यान या क्रीडा महोत्सवात माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या*
*पहिल्या दिवसाप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती. शिक्षकांच्याही जेवणाची सोय उत्तम होती.*
*कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय टीम मैदानात प्राथमिक आरोग्य सुविधांसह उपस्थित होती.*
*सर्व क्रीडा प्रमुखानी आपल्या टीममधील पंचांच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धा उत्तम प्रकारे पार पाडल्या.*
*सर्व स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर ,उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , गटशिक्षणाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व शिक्षक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.*
*बक्षीस वितरण समारंभावेळी समूहगान परीक्षक माधव गावकर व उदय गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत सहभागी होणारा विद्यार्थी किंवा संघ कधीही हरत नसतो ,तर तो शिकत असतो .स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी अनुभव देणारी असून या अनुभवातून उद्याचा कलावंत निर्माण होईल, असे ते म्हणाले. मुलांसाठी शिक्षक खूप मेहनत घेत असून या मेहनतीचा अविष्कार क्रीडा महोत्सवात दिसून येत असल्याचे परीक्षक उदय गोखले म्हणाले. यांनीही मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले*
*स्पर्धा संपल्यानंतर शिक्षणाधिकारी मा.आंबोकर साहेब व उपशिक्षणाधिकारी मा.आंगणे साहेब यांच्या समवेत क्रीडा समितीतील सदस्यांनी ,पंचानी व कर्मचारी वृंदानी सेल्फी पॉईंटवर फोटोसेशन केले. शब्दांच्या चिमटीत पकडता न येणारा हा सेल्फी फोटोसेशन उपक्रमाचा माहोल शिक्षण विभागात निश्चितच सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. यात शंका नाही.*
*स्पर्धेच्या शेवटी संध्याकाळी मुलांनी व शिक्षकांनी मैदानाची साफसफाई केली व या क्रीडा महोत्सवातून स्वच्छतेचा संदेशही दिला.*
*उद्या समूहनृत्य स्पर्धा नियोजित वेळेत सुरू करण्यात येतील. संबंधित संघ व्यवस्थापकांनी आपले संघ दहा वाजण्यापूर्वी उपस्थित ठेवावे.अशी सूचना शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब यांनी दिली.*
=====================================
वृत्तांकन लेखन समिती सिंधुक्रीडा महोत्सव ,सिंधुदुर्ग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा