मित्रांनो, अलिकडेच मी माझ्या 'होळी वेदनांची' या कवितेचे पोस्टर तयार करून एफबीवर डकवले होते. ब-याच माझ्या मित्रांना कवितेसह पोस्टर आवडले असावे. ब-याच मित्रांनी लाईकसह कमेंटही पाठविल्या होत्या.काहीनी शेअरही केलं होतं. याचा मलाही मनस्वी आनंद झाला होता.
आज मला अनेक मित्र -मैत्रिणी आहेत. प्राथमिक शाळेपासून, माध्यमिक, डी. एड्. ते एम्. फिल्. पर्यंतच्या जीवनप्रवासात तसेच सेवा, प्रवासाच्या माध्यमातूनही अनेक मित्र जोडले गेले आहेत. अजून व यापुढेही मित्र भेटत जातील.. तसे ते भेटतही आहेत.
विश्वास पाटील हा माझा साहित्यिक प्रवासातील नवा मित्र. कविता छान करताे, वाचनाची त्यांला विशेष आवड आहे. अध्यापन शास्त्र पदविका प्राप्त केलेल्या या तरुणाने नोकरीची वाट न पाहता कापड व्यवसायात लक्ष घातले. आता तो या व्यवसायात ब-यापैकी स्थिरावला आहे. त्याला तंत्रज्ञानाची आवड व जाणही उत्तम आहे. साहित्य व तंत्रज्ञानाशी तो स्वतःला जोडून घेऊ पाहतो आहे. साहित्य व तंत्रज्ञानावर तो भरभरून बोलतो. कविता लेखन करणे, वाचन करणे व कवितांना आशयानुरूप पोस्टर तयार करणे हा त्याचा छंदच बनून गेला आहे.
दोन दिवसापूर्वी विश्वासने माझ्या 'होळी वेदनांची ' या कवितेचे एफबीवर पोस्टर पाहिले. एफबीवर त्याने कमेंट तर टाकल्याच. दुपारी बाजरातून जात असताना दुकानात बोलवून घेऊन अप्रतिम, खूप छान, क्या बात? आदी गौरवशब्दांनी त्याने माझ्या कवितेचे व पोस्टरचे कौतुक केले. त्याने आपल्याही कवितांचे तयार केलेले पोस्टर मला दाखवले. त्याच्या कवितांचा चित्रमय खजिनाच मला पाहायला मिळाला. त्याच्या कविता जरी अप्रकाशित असल्या तरी, बहुतेक कवितांना आकर्षक चित्रासह सजावट केली होती. एखाद्या नामांकित प्रकाशकाने प्रकाशनाच्या हेतूनेच प्रसिद्ध चित्रकाराकडून कवितांना सजावट करून घेतल्यासारखे वाटत होते. त्याची डिजिटल पोस्टर पाहिल्यावर माझं पोस्टर तयार करण्याचे ज्ञान प्राथमिक स्वरूपाचे असल्याचे माझ्या लक्षात आलं. मी ते त्याला सांगूनही टाकलं. आकर्षक पोस्टर निर्मितीबाबत चर्चा केली.... साहित्यिक गप्पा-टप्पा मारून मी घरी आलो.
संध्याकाळी हॉटस् अॅप ओपन केलं. विश्वास पाटलाचा मेसेज दिसला. क्लिक केलं. ईमेज होती.. थोड्या वेळाने ईमेज डाऊनलोड झाली. पाहतो तर, विश्वास पाटीलने माझ्या कवितेला पोस्टरच्या माध्यमातून जिवंत केलं होतं. मी तयार केलेल्या पोस्टरच्या कैक पटीने सुंदर असं पोस्टर विश्वासने तयार केलं होतं. त्या पोस्टरने माझ्या कवितेची उंची वाढली होती. आशय अधिक बोलका केला होता.
विश्वासने माझ्या कवितेचं पोस्टर बनवून माझ्या कवितेला नवा गंध नि नवं रूप प्राप्त करून दिलं होते.जी कथा कवितेची तीच कथा मैत्रीच्या प्रांगणात जीवनासाठीही लागू पडते. विश्वास पाटलांसारखे अनेक मित्र आपल्या जीवनात आकर्षक रंग भरण्याचे काम करत असतात. अशा सर्व मित्रांना, या 'पोस्टर कथेच्या' निमित्ताने सलाम!
*श्री. विजय पाताडे*
*सहसंपादक*
*जीवन गौरव मासिक, महाराष्ट्र राज्य*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा